Monday, March 23, 2009

पेन्शनर


सका-सकाळी आपली आवरा आवर करुन खिडकीतून बघणारा,
नेहमी ह्या लोकांच्या गर्दीत कुठेतरी हरवलेला असा;
कुठे जातात ही सारी लोकं ईतक्या घाई-घाईत? काय करतात?
असे काही प्रश्न मनालाचं विचारावेसे वाटतात.
:
:
काळाचं एक-एक पाऊलं पुढे पुढे टाकत, स्वतःलाच सावरत,
मोडलेल्या लाकडी जिन्याचा आधार घेत पुढे सरकताना....
त्याचा तोल जात असताना कोणीतरी संभाळेल असं वाटतं.
कुठेतरी आपल्याला पोचायचयं ह्या विचाराने पाऊलं उतरतं जातयं.
:
:
पुढे रस्त्याच्या कडेला उभं राहून इकडे-तिकडे पहात,
लोकांची भिड पाहून स्वतःचाच घाबरलेला चेहरा;
समोर उघड्यावर बसलेल्या नावीच्या आरश्यात पहायला मिळतो.
थोडी भिरभिरी येता, त्याचं मोडलेल्या जिन्याकडे पावलं वळतात.
:
:
एक-एक पाऊलं चढत असताना त्याच्या जिवाला झालेला त्रास...
आज खुप थकायला झालयं; आज खुप काम केलयं मी.
पुन्हा तिच खिडकी, तोच रस्ता,तेच मुशाफिर,तोच मोडलेला जिना
आणि त्याच सलूनच्या आरश्यात घाबरलेला चेहरा दिसतोय...एका पेन्शनरचा!

No comments: