Tuesday, July 29, 2008

"दिवा"


दूर डोंगरातुन
हसते एक बाई;
कुबड्या टेकत
जाळते एक काडी.
तिच्या साडीला
जळण्याची लागली घाई;
साडी जळून
कातडी थोडी जळाली.
राहते लपुन
तिला कोण पाही?
वाटेवरला दिवा
तिला खुणवत राही.

"सातजणी"


सांजवेळी सातजणी
पाणीयाला गेल्या
माठ भरता भरता
पाणीयाशी खेळूनी आल्या....
पाणी भरताना
बांगड्या झाल्या ओल्या
त्यांना सावरताना
माठांना विसरुनी गेल्या....
घरी परतताना
हात हलवत आल्या
सातजणी गालातल्या
गालात हसत राहिल्या.....

Tuesday, July 22, 2008

"श्वास अडकेपर्यंत"


रात्रीचं खिडकीतून डोकावून पाहिलं ना की,
रस्त्यावरचे विझलेले दिवे,
काही फिरणारी पाखरे,
भुंकणारी कुत्री,
रात किड्यांचा आवाज,
स्वतःचेच कपडे फाडणारा एक वेडां माणूस....
डोळ्यांसमोर हे चित्र दिसतं.
आणि खिडकी बंद केली तर,
त्या वेड्या माणसाचा किंचाळण्याचा आवाज
रात्रभर कानात घुमत राहतो...
अगदी श्वास अडकेपर्यंत!

Monday, July 21, 2008

"गळाभर पाणी"


सांज ढळली स्वप्नात
आभाळाचे पांघरुण विशाल झाले;
कोठूनी कोण आले कळेना?
स्वप्नात गळाभर पाणी प्यायले.


अजुनी न जाग आली
सुकल्या गळ्याला भिजवता भिजवता;
पाणी पिऊन पिऊन
सारे आभाळ रिकामे झाले.


आपोआप स्वप्नात मी जागी
कुठलं आभाळं आणि कसलं पाणी?
मी डोळे उघडले तेंव्हा
काळोखात दिसलं वाहत पाणी.

Saturday, July 19, 2008

"कातरवेळी"


सांजवेळी...उतरत्यावेळी
डोईवरला माठ
थेंब थेंब गळी....
पाऊल टाकताना
वरतुन गगन
पुन्हा पुन्हा पाही....
कातरवेळी
घरा जाता
वाट विसरल्या पोरी....
घरा येता
सांज ढळता
काळोख त्यांना गिळून जाई...

"इंद्रधनुष्य"



ए...ए....ते बघ ना आकाशात

किती छान इंद्रधनुष्य आलयं....

किती छान ना?

किती सुंदर दिसताहेत ना रंग इंद्रधनुष्याचे?

खुप नशिब लागतं ना इंद्रधनुष्याचे

रंग बघायला?

-हो गं बरोबर आहे तुझं

पणं...

तुला आता रात्रीचं कुठं दिसलं हे इंद्रधनुष्य?

माझ्या डोळ्यांतुनं बघं तुलाही दिसतीलं

रंग इंद्रधनुष्याचे....

Friday, July 18, 2008

चिव...चिव....चिव...


चिव...चिव....चिव...
सकाळी उठताचं चिमण्यांचा आवाज
ऐकायला आला....
मी लगेचं उठून खिडकीबाहेर बघितलं तरं
काही चिमण्या बाहेर झाडाच्या फांदीवर
बसलेल्या पाहिल्या...
कुठेतरी ये जा करत होत्या.
प्रत्येक चिमणी एक एक तिनका
जमा करताना दिसतं होती.
पहाता पहाता त्यांनी स्वतःचं
एक छानसं घरं तयार केलं....
त्याच्या ह्या खेळाखेळात एक छानसं
घर तयार होईल हा विचार मी
कधीच केला नव्हता...

"काळोख"



हे एक संपुर्ण अनोळखी गाव...
ह्या गावात घरे तर खुप
दिसताहेत ...पणं,
मंद प्रकाश फक्त एकाच घरात
दिसत होता...
सुसाट वारा,दार बंद
खिडक्या मोडलेल्या....
गावच्या रेषेहुन मी
मोडलेल्या खिडकीतुन
फडफडना-या दिव्याला पाहण्याचा
प्रयत्न करत होतो...
जवळ जाताच त्या घराच्या
मी मोडक्या खिडकीतुन
काळोखाला पहाण्याचा
प्रयत्न करत होतो...

"फुलपाखरं"



-अरे ती फुलपाखरं बघं

तूला शोधताहेत कधीपासुन...

कुठे हरवलेलास तू?

-फुलपाखरं मला शोधताहेत का गं?

तू इतका गोड का आहेस?

हे तुला त्यांना सांगायचं आहे

आणि मला सुध्दा...

Thursday, July 17, 2008

कविता काय असते?


कविता काय असते?
एकटेपणाला मिळालेली साथ असते
सतत मिळतं असते
तुटतं नसते...
कविता काय असते?
हृदयातुन वाहणारी धारा असते
कितीही साचवली तरी
वाहतं असते...
कविता काय असते?
मनात लपलेली गुढ उदासी असते
दाखवली कोणाला तरी ती
दिसत नसते...कळतं नसते.

"तुझे अंग"


पडणा-या दंवात
भिजले तुझे अंग
झाडाच्या झुल्यावर
तु खेळतेस मात्र दंग...
केळीच्या पानाहून
कापरे तुझे अंग
मी येतो हुंगाया
तुझ्या रुपातला गंध....
का अशी उभी
माझ्यासमोर तु तंग?
मी घेईन तुला जवळ
करीन हात बंद...
जाउ नकोस दुर
खेचेल तुझा सुगंध
चाखुदे मला जरा
तुझ्या ओठांचा गुलकंद....

"गाबीत"


एक गाबीत खुप दिवसांपासुन
जाळ विणतोय सतत
हजारो लाखों माश्यांचा जिव अडकवायला.
ते जाळ समुद्रात टाकलं की,
त्या जाळ्यात लाखों रुपयें अडकणारं हमखास....
एक जाळ त्याच्या हातुन नकळतं
विणलं जातयं...
ते जाळं आयुष्यावर पडलं की,
श्वास आपोआपचं अडकणारं
स्वतःहून विणलेल्या जाळ्यात....
त्या जाळ्यात त्याचा जिव तडफडत राहिलं
लाखों रुपयांच्या जाळ्यात श्वास घेण्यासाठी....!

"अपंग जिवन"


कशाला फसव्या स्वप्नांवर मी जगत राहू?
कशाला माझा जिव मी जाळतं राहू?
विसरलो तरीही आठवतं सारं पुन्हा पुन्हा
कशाला ही आसवं डोळ्यांतुनी मी ढाळत राहू?
आठवाया,साराच आठवतो भुतकाळ मला
कशाला त्या क्षणातुन तुला मी टाळत राहू?
मोडून गेलीस तू स्वप्न सारी पाहिलेली
कशाला ती स्वप्न एकटाचं मी जोडत राहू?
सोडून गेलीस एकचं आधार होता जिवाला
कशाला हे अपंग जिवन मी जगत राहू?

"घडून गेले"


जिवनात घडायचे ते घडून गेले
मी मेल्यावर माझेचं लोकं हसुनी गेले....
किती कसे हक्क लावले त्यांनी लाकडांचे
ज्याने-त्याने स्वतःचे हिशेब आग लावूनी केले....
ही कसली माणूसकी?हा कसला धर्म?
जो-तो आला त्याने राखेचे हिस्से मागुनी नेले....
अता काय करणार इथल्या माणसांचे मी?
प्रत्येकाने आपलेचं खरे,हे सारे मानुनी केले...

Tuesday, July 15, 2008

"तळ्याकाठी"


मी तळ्याकडे
गेलो तेंव्हा
पुढे सारे
धुके-धुकेचं होते....


मी तळ्यापाशी
पोचलो तेंव्हा
तळे सारे
सुके-सुकेचं होते....


मी तळ्याकाठी
बसलो तेंव्हा
पक्षी सारे
प्यासे-प्यासेच होते....


मी पक्ष्यांकडे
बघीतले तेंव्हा
डोळे त्यांचे
भुके-भुकेचं होते....


पक्षी सारे
उडाले तेंव्हा
ओठ माझे
मुके-मुकेचं होते....


मी तेथुन
उठलो तेंव्हा
आयुष्यं माझे
सुने-सुनेचं होते....

"वा-यामागुन एक वादळं"


घराच्या खिडकीत बसुन
उजाडण्याची वाट पहात होतो...
छान वातावरण होतं पहाटेचं
सगळीकडे शांतता होती,
हवेत गारवा,रस्त्यावर मिणमिणते दिवे,
नुकतेचं दवाचे थेंब पडायला
लागणार इतक्यात...
अचानक वा-राची झुळूक मला
सांगुन गेली....
खिडकीत बसुन असतात का अशी वादळं पहायची?
दोन मिनीट मी सुन्न...
काही वेळाने वळून पाहिलं तरं...
त्या वा-यामागुन एक वादळं
अति वेगाने येतं होतं.
ते वादळं मला जाता जाता तेचं
सांगुन गेलं....
तुला वा-राची झुळूक नुकतीच
सांगुन गेलेली ना?
खिडकीत बसुन असतात का अशी वादळं पहायची....?.....मं?

Monday, July 14, 2008

"मुकाट नातं"


एक पक्षी जो वर्षानुवर्षे
उडण्याचा प्रयत्न करतोयं...
त्या आभाळाशी नातं जुळवण्याचा
प्रयत्न करतोयं...पणं,
कुणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी
त्या पक्ष्याचे पंख आधीच छाटले होते.
असं वाटतयं त्याच्या मनात
एक आशा कायम लपलेली आहे.
उंच उंच उडण्याची....
कधीतरी त्याला पंख फुटतील आणि तो
ह्या आभाळात उंच उंच उडेल....भरा-रा घेईल.
हे आभाळं आणि आयुष्यं त्याला दुसरी
संधी देणार नाही... हे त्याला कोण समजावेल?

"अंत"


एकाच वेळी व्याधींच्या अगणित
सुया शरीराला टोचत असतात
बहूतेक एके दिवशी एका सुईवर
माझ्या व्याधींचा किंवा
आयुष्याचा अंत लिहीलेला असावा.
असं वाटतं...!

Sunday, July 13, 2008

"भिक्षा"


दिवे लागणीची वेळ
काळोखाला भरु आले;
तिला हसताना पाहून
आभाळाला रडू आले.


रस्त्यात उभी ती
उघडी तिची चोळी;
कळ सोसुन घेते
चावतो एक कोळी.


कोणी केली असेल
अशी कठोर शिक्षा;
दिसते रस्त्यात उघडी
मागते मरणाची भिक्षा.

"काळी रात्र"


पुन्हा अनोळखी गाव
थोड्या विस्कटल्या वाटा
किती काळोख दिसता
पायात खुपला काटा....
रात्र उभी पावसाळी
ति वेडी व्यथेची
पायात घुंगरु घालुनी
एकटीच फिरली रात्रीची....
रात्र कधी सरली
हे ही तिला आठवेना
पहाट उजाडाताना
काळोखाची मिठी सोडवेना....

Friday, July 11, 2008

"देहाचा कागद"



१)
तिच्या देहाचा कागद
दिवसा एकदम
कोरा करकररीत,पांढराशुभ्र.
अन राता झाली की,
काही रंडीबाज
तिच्या दारावर उभे
कागद कुस्करायला...!
२)
आधल्या राती ही असेच झाले
एक वासरू वाट चुकलेला
तिच्या घराबाहेर उभा...
तिने नं विचारता आत घ्यावं
अन हळूचं दार
आतुन लावावं एवढंच...!
३)
रात्रीच्या आवाजात
एक वेगळाचं आवाज ऐकु आला
को-रा करकरीत कागदावर
लाल रंगाची शाई उडल्याचा
आवाज कानी घुमत राहीला.
४)
पहाटे पहाटे
तिने तो देहाचा कागद
साफ धुवून पुसुन स्वच्छ करुन
घराआत वाळंत ठेवलायं.
आज रात्री कोणतरी
रंडीबाज येईलचं
कोरा करकरीत कागद कुस्करायला....!

Thursday, July 10, 2008

"फुली-गोळा"



फुली-गोळा हा खेळ

लहानपणा पासुन खुप खेळतोय...

लहान असतान मज्जा म्हणून खेळायचो,

जसजसा मोठा होत गेलो

त्या खेळातल्या रेषा पुसट होत गेल्या...

पुसट झालेल्या रेषांमधल्या अंतराला

मापण्याचा प्रयत्न मी करायचो.

आजही तो खेळ खेळताना

त्या रेषांना मोजण्याचा प्रयत्न मी करतो.

Wednesday, July 9, 2008

"शेवट"


एके दिवशी को-रा पानांवर
मी माझे आयुष्यं लिहीत होतो...
लहाणपणा पासुन सुरुवात केली लिहायला,
लिहीता लिहीता बरीचं पाने भरली शब्दांनी,
मी लिहीतोय आणि पाने संपताहेत...
लिहीता लिहीता एक क्षण मनात विचार
आला माझ्या,
सुरुवात तर केली खरं लिहायला
पणं ह्या आयुष्याचा शेवट कधी होईल?

Monday, July 7, 2008

"श्वास माझे"


दुःख माझे मला छळायास लागले
हसणे माझे दुर पळायास लागले!
कितीशी स्वप्नं पाहिली आयुष्यातं?
सुकलेले अश्रु पुन्हा गळायास लागले!
केले सवाल मी माझ्या आयुष्याला
माझेच प्रश्न मला कळायास लागले!
कसे शोधू आता हरवलेले क्षण?
श्वास माझे सावकाश ढळायास लागले!

"आकाश फाटलेले"


रानावरुन गेले आकाश फाटलेले
आयुष्याने माझे पंख होते छाटलेले!
कुठल्या वेळेचा होतो मी गुन्हेगार?
चांगले विचार मनाने होते टाकलेले!
चालणार होतो काही पावले आनंदात
पाय माझे व्याधींनी होते कापलेले!
इच्छा होती काही क्षण जगायची
पणं...काळजाचे ठोके होते थांबलेले!

"काठावर"


तळ्याचं पाणी एकदम स्थिर
त्यात दिसतयं प्रतिबिंब...
चरणा-या प्राण्यांच,उडणा-या पक्ष्याचं,
हलणा-या झाडाचं आणि माझं सुध्दा...
पाण्यात एक दगड टाकला की,
एका मागोमाग एक वर्तुळे
हलतान दिसतात.
त्या वर्तुळात सर्वांच प्रतिबिंब दिसतयं तसचं
फक्त मी कुठे दिसतं नाही आहे....
कधी कधी त्या वर्तुळात स्वतःला हरवल्या सारखं वाटतं.
पणं त्या पाण्याला माहित आहे मी
तिथेच आहे कुठेतरी...
पणं...मनाचा प्रयत्न अपुरा पडतो
स्वतःला काठावर शोधण्याचा!!!

"डायरी"


एके दिवशी एक अनोळखी व्यक्ती
माझ्या घरात आला....
कपाटात असलेल्या माझ्या जुन्या डायरीला
तो फाडत होता.
तो काहीचं नं बोलता
निघुल गेला....
दुस-या दिवशी त्याच डायरीला
आग लावून मी हसत होतो.

Sunday, July 6, 2008

'सतारी'


एका छानश्या संध्याकाळी
समुद्राच्या ओल्या वाळूवर
पावलं टाकत चालत होतो...
पावलांचे ठसे वाळूवर अलगद
उमटतं होते...
समुद्राच्या लाटा हळूवार
पायांना स्पर्शुन जायच्या
आणि त्या लाटांच्या परतण्याचा आवाज
'सतारी' सारखा कानात घुमत राहायचा...
मी त्या आवाजात अडकून
किना-रापासुन दुरावत होतो
इतकचं मला कळतं होतं...!

चिंब भिजल्या डोळ्यांनी...!


धो...धो...धो....
पाऊस बरसतं होता
आणि मी उभा घराच्या खिडकीत,
पाऊस पहात होतो.
मी एकटा एकाकी दुर
उभा राहुन भिजणा-या काठाला पहात होतो.
एक विचार मनात आला,
चार बांबूच एक छोटसं घर बांधाव
त्या ओल्या काठावर....अन्
आत बसुन येणा-या वादळाला
निमुटपणे पहावं...
चिंब भिजल्या डोळ्यांनी...!

Friday, July 4, 2008

"तु बोललीस - मी बोललो"


तु बोललीस - सुटू दे आज बेभान वारा,

मी बोललो - येशील कशी मला भेटायला?

तु बोललीस - येईन सा-या परतीच्या वाटा सोडून...,

मी बोललो - त्या वा-रात वाटा ही नं दिसे अधुन-मधुन,

तु बोललीस - येईन हळूहळू सोसत वारा,

मी बोललो - नको सोसुस हा दुष्ट वारा...

तु बोललीस - घेईन लपेटून शाल अंगावर नाही लागणार हा दुष्ट वारा...,

मी बोललो - देऊ नकोस दोष त्या येणा-रा वादळाला,

तु बोललीस - कोणत वादळ रे? मी तर तुझ्या मिठीत आले ना आता?

"सामील"



रस्त्याच्या कडेकडेने चालताना

फुटपाथवर एक तान्हं मुल

रडतं-रडतं, ईकडे-तिकडे बघतं

श्वास घेतं होतं....

थोडे श्वास घेऊन झाले कि,

थकायचं ......

कळतं-नकळत कोणत्यातरी एका

व्यक्तीचे श्वास त्या मुला मध्ये

सामील होत होते.

Thursday, July 3, 2008

"गाढ झोप"


मध्य रात्र होते आणि
मला हळूचं जाग येते...
उठून मी इथे तिथे पहातो तर
सगळीकडे काळोख असतो.
तु बाजुला झोपलेली दिसतेस
तेंव्हा कुठे माझी भिती दुर होते.
तुझ्या हृदयावर डोक ठेउन,
माझा हात तुझ्या हातावर ठेवतो.
तु हळुचं तुझा हात दुमडल्यावर
मला पुन्हा गाढ झोप लागते.

"बाळं हसतं राहिलं"



अचानक उंबरा ओलांडून

बाळं बाहेर आलं...

घराच्या आवारात छान पैकी

पसारा मांडून खेळत होतं.

आजुबाजुच्या झाडांची साउली

बाळावर येत होती...

झाडावरुन गळलेली पाने

बाळाच्या आजुबाजुला जमा झाली.

ति सारी पाने उडण्याआधी

अचानक बाळाला गच्च

मिठी मारुन गेली.

आणि माझं बाळं हसतं राहिलं.

Wednesday, July 2, 2008

"अस्पष्ट आकृती "


घुमणा-रा वा-राचा आवाज,
व्हाळाचा आवाज,
फडफडणा-रा पक्ष्याचा आवाज,
छत्री घेउन अंधारात
चालणा-रा व्यक्तीच्या
पावलांचा आवाज,
चुल फुंकताना
नळीतुन आलेला आवाज,
हे आवाज ऐकणा-रा
एका व्यक्तीच्या हसण्याचा आवाज....
त्या व्यक्तीची एक
अस्पष्ट आकृती
रात्री झोपेत दिसते.

"पाखरांशी नात"



दुरुन पाहिलं तर क-हाड जळतं होतं
रानाला आगीशी झुंजताना मी पाहिलं होत....

जिव वाचवत होती सारी पाखरे
तेंव्हा पाखरांच रानाशी नातं तुटतं होतं....

जळून राख झाली काही पाखरे
ते पाहुन मनं माझं रडलं होतं....

मी उभा पाहत राहिलो जळताना सारं
माझं पाखरांशी नात मला कळालं होतं....

Tuesday, July 1, 2008

"चिंच"


लहाणपणी शाळेत जाताना
वाटेतल्या चिंचेच्या झाडची चिंच
चोरुन चोरुन खायचो....
नेहमीचाचं असा खेळ होता आमचा
खुप मज्जा यायची चोरुन चोरुन
चिंच खायला.
एक दगड मारला की,
दोन चार चिंचा हमखास पडायच्या...
जमिनीवर पडलेल्या चिंचा उचलताना
व्हायची मं भांडण आमच्यात
"हि माझी चिंच आहे आणि हि तुझी चिंच आहे."
त्या भांडणाचा आनंद अजुनही मनात आहे,
त्या चोरलेल्या चिंचेची आंबट गोड चव
अजुनही जिभेवर आहे तशीच...
जातो कधी कधी त्या वाटेवर
मनात आलं कि...
मनात तर असतं माझ्या
एक दगड मारुन मस्त पैकी
दोन चार चिंचा पाडायच्या....पणं,
भांडायला ते मित्र नसतात आता.

"चिमुरडी"


का केलं? कोणी केलं? कश्यासाठी केलं?
तिचे ओठ विणलेले, डोळे उघडेच्या उघडे
न हातापायांची हालचाल,
ना कसलीच हालचाल....
एका निर्जीव वस्तु प्रमाणे स्वतःला
आरश्यात पहात असते....
सारं काही सुन्न झालेलं दिसत होतं.
तिच्या मनातली किंकाळी मात्र साफ ऐकायला येत होती...
का केलं?कोणी केलं?कश्यासाठी केलं?
ह्या प्रश्नांची उत्तर ति नं ऐकू येणा-रा
किंकाळीत शोधत बसलीयं....
प्रश्नांच्या वादळात अडकलेली एक चिमुरडी
आरश्यासमोर स्वतःला सारखी सारखी
लुटताना पहात असते.

कधी मी जागा होईन?


संध्याकाळी समुद्राच्या ओहोटीला
पाहून एक विचार मनात येतो...
कधी त्या ओहोटीच्या लाटा
बेफामपणे माझ्या दिशेने येतील आणि
मला भिजवून टाकतीलं?
आणि कधी मी जागा होईन?
मी स्वतःला जाग करण्याची
वाट पहात असतो...
त्या समुद्राकडे पहात पहात...

"तडीपार"


ह्या गारव्यात एका छानश्या
जागी शेकोटी पेटवून...
रात्रीला गच्च मिठी माराविशी वाटते.
आणि त्या मिठीत पुरी रात्र
जागयची...काढायची...
ज्या वेळी मी असा विचार करतो
त्यावेळी हि रात्र मला
तडीपार करते...

"तुला इतकं सांगुन"



तुला इतकं सांगुन सुध्दा
तु नाही ऐकत...
तुझ्यावरं कविता लिहायला
मला तु नेहमीचं
गळ घालतेस...


तुला इतकं सांगुन सुध्दा
तु नाही ऐकत...
तुझ्यावर लिहीलेल्या कवितांना
तुझ्यासोबत लपवून
घेउन जातेस.....